फलटण : विकास बेलदार
फलटण तालुक्यातील कापशी येथे शरदचंद्रजी पवार साहेबांचे पुतणे श्रीनिवास पवार यांनी शेतक-यांच्या हितासाठी शरयू सहकारी साखर कारखाना उभारलेला आहे. परंतु शरयू कारखाना व्यवस्थापनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे शरयू कारखाना फलटण तालुक्यात चर्चेचा विषय ठरतो आहे आणि त्यामध्ये फलटण तालुक्यातील शेतकरी भरडला जात आहे. कारखान्यासाठी लागणा-या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शरयू व्यवस्थापनाने फलटण तालुक्यातील तडवळे येथे अंदाजे तीन चार वर्षांपुर्वी स्वतःच्या जागेवर परंतु नजीकच असलेल्या निरा कॅनाॅल व लोकवस्तीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जिलेटीन वापरुन ब्लास्टींग करत विहीरीचे खोदकाम केले असल्याची तक्रार तेथील शेतकरी यांनी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे केली होती.
सदर विहीर खोदकामात मोठ्या प्रमाणावर जिलेटीन वापरुन ब्लास्टींग केल्यामुळे घराला मोठ्या प्रमाणात तडे जाऊन घराचे नुकसान झाली असल्याची तक्रार तडवळे गावातील शेतकरी दिपक कुंभार यांनी फलटण प्रशासनाकडे मागील काळात सदर घटना घडल्यानंतर केली होती. सार्वजनिक बांधकाम फलटण विभागाने तक्रारीनंतर घराचे सर्वेक्षण केले असता एकुण चार लक्ष बारा हजार रुपये एवढा दिपक कुंभार यांच्या घर दुरुस्तीसाठी खर्च येणार असल्याचे तहसीलदार फलटण यांना दिलेल्या लेखी अहवालात म्हटले आहे. त्यावर शरयू कारखान्याचे संचालक अविनाश भापकर यांनी आमच्या जिलेटीन ब्लास्टींगमुळे घराचे नुकसान झाल्याचे सिद्ध झाल्यास शरयू कारखाना संबंधित शेतक-यास झालेली नुकसान भरपाई देईल असा वकीली युक्तीवाद केला आहे.
कारखान्याचे संचालक अविनाश भापकर यांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे संबंधित शेतकरी न्यायासाठी अंदाजे तीन चार वर्षांपासून फलटण प्रशासनाकडे हेलपाटे मारत आहे. सदर प्रकरणात पवार कुटुंबियांनी लक्ष घालुन न्याय द्यावा अशी भावना फलटण तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
सदर तक्रारीची दखल घेऊन शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी शिवसेनेच्यावतीने फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांचेकडे सदर विहीर खोदकामाची सखोल चौकशी करुन संबंधित शेतक-याला न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. दिलेल्या निवेदनाची दखल घेत प्रांताधिकारी यांनी शरयू विहीर खोदकामाच्या सखोल चौकशीचे आदेश तहसीलदार फलटण समीर यादव यांना दिले आहेत. तहसीलदार समीर यादव यांनी होळ मंडलाधिकारी भांगे यांना निवेदनात दिलेल्या मुद्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.