बारामतीमधील विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गणेश विर्सजनाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवून गणेश मूर्तीच्या विसर्जनाचे योग्य नियोजन करावे आणि कोरोना बाधीतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखावे,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.बारामती परिसरातील सार्वजनिक कामांच्या पाहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना,संसर्गाची सद्यस्थिती प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, कोरोना चाचण्या,पॉझिटिव्हीटी रेट,मृत्यूदर ग्रामपंचायतीची संख्या लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सीजन उपलब्धता,आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. ते म्हणाले,तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयीसुविधा तयार ठेवणे आवश्यक आहे.कोरोना उपाययोजनाच्या दृष्टिकोनातून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांचा योग्य वापर करण्यात यावा.

बैठकीला मुख्याधिकारी महेश रोकडे,गटविकास अधिकारी अनिल बागल,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे,ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव आणि विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

बारामती परिसरात सुरू असणारी विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, मेडद येथील आयुर्वेदिक कॉलेजच्या जागा, परकाळे बंगला येथील कॅनलवरील सुशोभिकरण कामाची पाहणी केली. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विकास कामांची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच कामाचा दर्जा उत्तम राहील याकडे विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. सर्वच विभागांनी विकास कामे समन्वयाने पार पाडावीत, निधीचा पुरेपूर वापर करावा. सर्वानीच जबाबदारी स्वीकारून कामे करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्त्यांचे भूमिपूजन

 मोरगाव  रोड गट न.२२० ते जामदार रोड,गट नं.१३७ ते निरा रोड, गट नं ३४८ ते फलटण रोड गट नं.५३ पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे सदस्य सुरेश सातव, गट नेता सचिन सातव, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. 

*ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

शासकीय वैद्यकीय महविद्यालय येथे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक केशव घोडके, अभ्यागत समितीचे सदस्य, प्राध्यापक, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

या प्रकल्पाची क्षमता एक हजार लिटर्स प्रति मिनिट असून वातावरणातून हवा घेवून ऑक्सिजन निर्मिती केली जाते. यावेळी आजिंक्य बिग बजार, बारामती यांच्यातर्फे कोठरी मशिन, मायक्रोव्हेव व कमर्शियल कॉफी मशिन वैद्यकीय महाविद्यालयास भेट म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अजिक्य गांधी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

बैठकीपूर्वी रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट व एस बी आय कॅपीटल फायनान्स तर्फे देण्यात आलेल्या 41 ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ग्रामीण रुग्णालय बारामतीसाठी देण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *