नगरपालिकेच्या कामांविरोधात तक्रार करणे एवढाच विरोधकांचा अव्याहत उद्योग,भाजपच्या आंदोलनाला श्रीमंत रघुनाथराजेंचे चोख प्रतिउत्तर….!!


फलटण : विकास बेलदार ( महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज)

नगरपालिकेच्या कामात अडचणी निर्माण करायच्या आणि कामे हाणून पाडायची एवढेच काम गेली पाच वर्षे विरोधकांनी केले आहे. अनेक कामांविरोधात त्यांनी तक्रारी केल्या पण एकाही तक्रारीचा निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. नगरपालिकेच्या कामांविरोधात तक्रार करणे एवढाच विरोधकांचा अव्याहत उद्योग आहे’’, अशी टीका फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केली.फलटण शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यात वृक्षारोपण करुन पालिकेच्या विरोधात आंदोलन केले होते. सदर आंदोलनाला प्रति उत्तरादाखल श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

श्रीमंत रघुनाथराजे पुढे म्हणाले,विरोधकांना फलटण शहराचा विकास हवा आहे या गोष्टीवरच आपल्याला विश्‍वास नाहीये. यांना केवळ स्वत:चा विकास करायचा आहे; तालुक्याच्या विकासात यांचे योगदान आपल्याला कुठेही दिसत आहे. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. परंतु या सर्व रस्त्यांची कामे मंजूर असून निवडणूकीपूर्वी ही कामे पूर्ण देखील होणार आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यात झाडे लावणे हे त्यांचे केवळ एक नाटक आहे’’, असा आरोपही श्रीमंत रघुनाथराजे यांनी केला.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कोरोना काळात लोकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. हे काम करत असताना नेते, पदाधिकार्‍यांना कोरोनाची बाधा झाली, काहीचे प्राणही गेले परंतू आम्ही मदत कार्य थांबवले नाही. बाजार समिती मार्फत संपूर्ण फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात फिरत्या दवाखान्याची सोय करण्यात आली होती. त्यावेळी ही झाडे लावणारी मंडळी कुठे होती?’’, असा सवालही श्रीमंत रघुनाथराजे यांनी यावेळी उपस्थित केला.

आज तालुक्यातील आंदरुड पर्यंत पाणी नेऊन ना.श्रीमंत रामराजे यांनी तालुक्याचा भक्कम विकास केला आहे. ज्याप्रमाणे निरा उजवा कालव्यातून पाणी वाहताना श्रीमंत मालोजीराजे यांचेच नाव घेतले जाते त्याचप्रमाणे धोम-बलकवडीच्या कॅनॉलमधील पाणी वाहिल्यानंतर श्रीमंत रामराजेंचेच नाव कायम घेतले जाणार आहे. प्रत्येक वेळेला आम्ही विरोधकांच्या खोट्या आरोपांकडे दुर्लक्ष करत आलेलो आहोत; पण आता इथून पुढे त्यांना चोख उत्तर दिले जाईल’’, असेही श्रीमंत रघुनाथराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *