कामे तात्काळ सुरू,अन्यथा आंदोलन छेडण्याचा वंचित बहुजन आघाडीचा ईशारा…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
निरावागज ग्रामपंचायत हद्दीतील मागासवर्गीय वस्तीतील रस्ते तसेच इतर कामे मंजूर झालेली असून देखील केवळ आणि केवळ कामाचा ठेका कुणाला द्यायचा या वादामुळे दलित वस्तीतील कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.पाऊस झाल्याने प्रमुख तिन्ही मागासवर्गीय वस्तीतील जवळ जवळ सर्वच रस्ते चिखलाने माखलेले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अर्धा एक किलोमीटर दूध डेअरीला घालायला दुधाच्या किटल्या घेवून पायी चालत जावे लागत आहे.तसेच गाड्या असणाऱ्या लोकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याचे काम करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या कडून करण्यात येत होती.कित्येक वर्षांनी हे काम मंजुर झाले असताना,देखील या रस्त्याकडे ग्रामपंचायत लक्ष देताना दिसत नाही.रस्त्याचे काम मंजुर झाल्यापासून जवळपास सर्वच स्थानिक लोकांनी वारंवार लेखी,तोंडी मागणी करून देखील ग्रामपंचायत कार्यालय निरावागज रोडचे काम सुरू करण्याकडे कसल्याही प्रकारचे लक्ष देताना दिसत नाही. काम मंजूर असून देखील फक्त कंत्राटदारांच्या भांडणामुळे रोडचे काम रखडलेले आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांचे ये-जा करण्यासाठी होणारे हाल लक्षात घेवून येत्या दहा दिवसांच्या आत ग्रामपंचायतने रोडचे काम सुरू न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.
येत्या पंधरा दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू करू असे आश्वासन ग्रामपंचायत कडून देण्यात आले.यावेळी नालंदा विपश्यन प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले,वंचित बहुजन आघाडीचे रोहित भोसले,उमेश भोसले,सुरज भोसले,प्रदीप भोसले,हेमंत भोसले,प्रियांका देवकाते तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश निकाळजे आणि ग्रामविकास अधिकारी कारंडे साहेब तसेच आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या पंधरा दिवसांच्या आत कामे सुरू न झाल्यास आंदोलन करणार असल्याची माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलनचे बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले यांनी दिली.