मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अखेर अटक वॉरंट जारी…!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अखेर अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.परमबीर सिंह यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्या.चांदीवाल आयोगाने हे जामीनपात्र वॉरंट बजावले आहे.परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर यावर्षीच्या मार्च महिन्यात महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली होती.आयोगासमोर चौकशीसाठी हजर राहण्यासाठी न्या.चांदीवाल आयोगाने परमबीर सिंह यांना अनेकदा समन्स बजावले आहेत. परंतु परमबीर सिंह आयोगासमोर हजर झालेच नाहीत.त्यामुळे
न्या.चांदीवाल आयोगाने आता त्यांच्याविरुद्ध वॉरंट बजावले आहे.चौकशी आयोगासमोर गैरहजर राहिल्यामुळे न्या.चांदीवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंह यांना जूनमध्ये पाच हजार रुपये आणि गेल्या महिन्यात दोन वेळा २५-२५ हजार रुपये दंडही ठोठावला आहे.

आयोगाने मागच्या सुनावणीच्या वेळी जर परमबीर सिंह पुढील सुनावणीला हजर झाले नाही तर त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले जाईल,अशा कठोर शब्दात सांगितले होते. परमबीर सिंह यांना आज न्या. चांदीवाल आयोगासमोर हजर रहायचे होते.पण ते हजर झालेच नाहीत.त्यामुळे त्यांच्या विरोधात हे वॉरंट बजावण्यात आले आहे.आता २२ सप्टेंबर रोजी न्या.चांदीवाल आयोगापुढे या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. न्या.चांदीवाल आयोगाने बजावलेले हे ५० हजार रुपयांचे बेलेबल वॉरंट आहे.एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यामार्फत परमबीर सिंह यांना हे वॉरंट तामील करावे,असे निर्देशही न्या. चांदीवाल आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत.मार्चमध्ये मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी करून त्यांची होमगार्डमध्ये बदली केल्याच्या दुसऱ्याच दिवशी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील रेस्टॉरंट्स आणि बारकडून दरमहा शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.परमबीर सिंह यांच्या या लेटरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.त्यामुळेच अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *