मनोहर भोसलेनीं बेकायदेशीर उंदरगावचा मठ बांधल्याचा
आदमापूर ग्रामपंचायतीचा लेखी खुलासा….!
आदमापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( संपादक : विकास कोकरे )
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे मनोहर भोसले हे उभारीत असलेला मठ हा ग्रामपंचायतीची परवानगी न घेता उभारला जात असल्याचे आदमापूर ग्रामपंचायतीला लेखी पत्राद्वारे कळविले असल्याने मनोहर भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये उंदरगाव आणि मनोहर मामा चांगलेच चर्चेत आले आहेत.मनोहर भोसले यांच्या नातेवाइकांनीच आता त्यांच्या उंदरगाव येथील मठात चालणाऱ्या घटनांबद्दल बाहेर उघडपणे बोलण्यास सुरवात केली आहे.मनोहर मामाच्या मठात होणारी भाविकांची गर्दी,येणाऱ्या गाड्यांच्या पार्किंग व्यवस्थेचे प्रश्न,येण्या-जाण्याच्या रस्त्यावर होणाऱ्या अडचणी अशा किरकोळ कारणावरून स्थानिक पातळीवर मनोहर मामांचे त्यांच्या जवळच्या नातेवाइकांशी मतभेद वाढत गेले.
बाळूमामांची समाधी असलेल्या अदमापूर (जि.कोल्हापूर)येथील ग्रामपंचायतीने ठराव घेऊन उंदरगाव (ता.करमाळा) येथे मनोहर भोसले हे बाळूमामांच्या नावाखाली पैसे गोळा करत, असल्याचा निषेध करत चौकशीची मागणी केली आणि उंदरगाव येथील मनोहर मामाच्या मठाकडे संशयाची सुई वळली. यातूनच आज हे सर्व प्रकरण चव्हाट्यावर आले असतानाच आदमापूर ग्रामपंचायतीने उंदरगाव ग्रामपंचायतीकडे मठ बांधण्यासाठी परवानगी दिली आहे का ? असे लेखी विचारले होते त्यावरून मनोहर भोसलेंनी आमच्या ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी मागितली नाही व ग्रामपंचायतीने ही तशी परवानगी दिली नाही असे पत्र आदमापूर ग्रामपंचायतीस दिले असल्याने मनोहर भोसलेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. येथील मनोहर भोसले यांच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी हा गेली दोन-चार वर्षांपासून करमाळा तालुक्यात चर्चेचा विषय आहे.सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उंदरगाव ता.करमाळा येथे मनोहरमामाच्या दर्शनासाठी येत असल्याची कायम चर्चा होती.
मनोहर भोसले आता वादग्रस्त ठरल्यानंतर अनेक बड्या-बड्या नेत्यांबरोबरची त्यांची छायाचित्रे सोशल मीडियातून पुढे येऊ लागली आहेत.त्यामुळे सुरवातीच्या काळात सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींवर मार्ग सांगणारे मनोहर भोसले अलीकडच्या काळात मात्र ते सर्वसामान्यांचे न राहता धनदांडग्या उद्योगपती, सिनेकलाकार,राजकारणी यांचे गुरू झाले होते.मात्र आता या सर्व बड्या भक्तांची मात्र चांगलीच गोची झाली आहे.करमाळा तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी मनोहरमामा यांच्या मठात हजेरी लावल्याचे बोलले जात आहे.याशिवाय राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा या पक्षातील प्रमुख जबाबदार नेते असतील,त्यांनी देखील मठात हजेरी लावली आहे तर काही राजकारण्यांच्या घरी जाऊन महाराजांनी दर्शन दिले आहे. आता मात्र महाराजांवर होत असलेल्या आरोपांमुळे या राजकीय भविष्य जाणून घेणाऱ्या राजकारण्यांची मात्र पंचाईत झाल्याचे दिसून येत आहे.ज्यांनी महाराजांच्या सांगण्यावरून राजकीय वाटचाल सुरू केली आहे,अशा अनेक राजकारण्यांची आता अडचण होऊन बसली आहे.मनोहरमामांचा सल्ल्यावरून अनेकांना मंत्री, आमदार व्हायचे होते.तर कुणी नव्याने राजकारणात प्रवेश करून राजकीय भवितव्य आजमावू पाहणार आहे,तर कुणाला अधिकाऱ्याची पोस्ट हवी आहे. अशा लोकांची पुढील भूमिका काय ? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.