BIG BREAKING |बारामतीत चुकीचा ब्लड रिपोर्ट देणे पडले महागात; प्रयोगशाळा तात्पुरती बंदचे आदेश….


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

वेलनेस डायग्नोस्टिक सेंटर,बारामती यांनी दिलेल्या चुकीच्या रक्तगट अहवालामुळे एका गर्भवती महिलेला धोका निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला असून,याप्रकरणी संबंधित प्रयोगशाळेविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर उपजिल्हा रुग्णालय,बारामती यांनी तत्काळ चौकशीचे आदेश देत संबंधित प्रयोगशाळेची चौकशी होईपर्यंतची सेवा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

ही घटना  गर्भवती महिलेच्या बाबतीत घडली आहे. विनय दामोदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 4 जुलै 2025 रोजी वेलनेस डायग्नोस्टिक सेंटरने गर्भवती महिलेचा  ब्लड ग्रुप B Negative असल्याचे सांगितले. या रिपोर्टच्या आधारित डॉक्टरांनी उपचाराचे नियोजन केले. मात्र प्रत्यक्ष डिलिव्हरीवेळी रक्त आवश्यक असल्याने,ब्लड बॅग बुक करताना त्यांच्या रक्तगटाबाबत साशंकता निर्माण झाली.त्यामुळे दुसऱ्या लॅबमध्ये चाचणी केल्यावर B Positive असा प्रत्यक्ष ब्लड ग्रुप समोर आला.

यामुळे महिलेला अनावश्यक वैद्यकीय त्रास आणि मानसिक धक्का बसला.हा प्रकार अत्यंत निष्काळजी पणाचा असून जीवघेणा ठरू शकतो, अशी तक्रार दामोदरे यांनी केली आहे. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या तक्रारीची गंभीर दखल घेत उपजिल्हा रुग्णालय बारामतीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी दिनांक ३१/०७/२०२५ रोजी आदेश काढून,वेलनेस डायग्नोस्टिक सेंटरची चौकशी होईपर्यंत सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हा प्रकार आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण मानले जात असून, संबंधितांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *