इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एखाद्या चित्रपटाला शोभेल असे बॉम्ब वालचंद नगर पोलिसांनी दरोडेखोरांकडून ताब्यात घेतलेत,यामुळे इंदापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय.सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके,वय २३ वर्षे, रा.कळंब ता.इंदापुर असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नांव आहे.याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..वालचंदनगर पोलिसांनी ऐन गणपती व ईद-ए-मिलाच्या मुहूर्तावर केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके याच्याकडे सुतळी बॉम्बसह पिस्टल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वालचंदनगर पोलीस त्याचा शोध घेत होते.तो वालचंदनगर येथील अंजली बाल मंदीर क्रमांक ०१ येथील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी – ०३ मधील खोली क्रमांक ०३ मध्ये त्याच्या मित्रांसोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली.त्यानुसार वालचंदनगर पोलिसांच्या पाथकाने त्या ठिकाणी सापळा लावला आणि आरोपीला ताब्यात घेतले.
यात पोलिसांनी त्यांच्याकडून 3 गावठी पिस्टल मॅग्झीन सहीत एक खाली मॅग्झीन,दहा जिवंत काडतुसे (राऊंड),चौदा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दोन लोखंडी कटर,एक लोखंडी तलवार,दोन लोखंडी चाकु, एक मुठ नसलेले तलवारीचे पाते आणि 9 सुतळी बॉम्ब असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वालचंदनगर पोलिसांनी तलवारी कोयते घेऊन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळीच सापळा रचून त्याच्या मुस्क्या आवळल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिली आहे.