आव्हाडांना राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो याची पूर्ण कल्पना आहे
मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षांचं मोठ विधान कळव्यातील उड्डाणपुलाच्या उदघाटनानंतर गर्दीतून बाहेर पडत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेकडून करण्यात आली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय सुडापोटी हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. परंतु पक्षातील नेत्यांनी त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आव्हाड यांच्या राजीनाम्याबद्दल विचारला असता, त्यांनी अद्याप राजीनामा प्राप्त झाला नसल्याचं सांगितले आहे. “आव्हाड हे विधिमंडळातील वरिष्ठ सदस्य असल्याने आमदारकीचा राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. अद्याप त्यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही,तो मिळाल्यानंतर स्वीकारण्यापूर्वी पूर्ण पडताळणी करून नियमानुसार प्रक्रिया पार पाडली जाईल”,असं नार्वेकर यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना नार्वेकर म्हणाले, एखाद्या गुन्ह्या संदर्भात चौकशी सुरु असल्यास पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. सामान्य नागरिक असो कि आमदार त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. विधीमंडळ सदस्यांचे अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी सभागृहाची आणि अध्यक्षांची आहे. कोणत्याही सदस्यासोबत बेकायदेशीर घटना घडली असेल तर जाब विचारला जाईल.