बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
डोर्लेवाडीतील ( बारामती ) तरुणाच्या प्रसंगावधान व धाडसामुळे डोर्लेवाडीत चोरी करण्यास आलेल्या पाच जणांच्या चोरांचा दरोडा फसला आहे. मात्र चोरांनी शेजारील झारगडवाडी गावात आपला मोर्चा वळवून रोख रक्कम व दागिने लुटले. यामुळे डोर्लेवाडी, झारगडवाडी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी करणारे पाच चोर डोर्लेवाडीतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. पोलीसासमोर चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
डोर्लेवाडी येथील अजित प्रल्हाद जाधव हे शुक्रवार रात्री सव्वा एकच्या सुमारास लघुशंकेसाठी घराच्या बाहेर आल्यानंतर त्याना रस्त्यावर काही व्यक्तींच्या हालचालींचा आवाज आला. त्यामुळे ते रस्त्यावर आले असता घराच्या पुढून युनियन बँकेकडे जाताना ५ अनोळखी व्यक्ती आढळून आले. जाधव यांच्या गेटचा आवाज आल्यानंतर चोर माघारी फिरले. घराच्या गेट समोर रस्त्यावर चोर धारधार हत्यारा सहित समोरासमोर आल्यानंतरही जाधव हे धीराने उभे राहिले होते त्यानंतर थोड्यावेळात चोर तिथून निघून गेले.
जाधव यांनी लगेचच गावातील पोलीस पाटील नवनाथ मदने, बारामती शहर पोलीस स्टेशन व गावातील नागरिकांना फोन द्वारे सतर्क केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला नाहीतर गावात जबरी चोरी किंवा दरोडा पडला असता. मात्र डोर्लेवाडी येथील चोरीचा डाव फसल्यानंतर चोरांनी आपला मोर्चा शेजारील झारगडवाडी गावात वळवून पिंपळी रोड नजीक असणाऱ्या शंकर तात्याबा राऊत यांच्या घराचा आतील कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला व रोख रक्कम १ लाख रुपये व १ तोळा सोने असा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला घटनेची नोंद झाली आहे. डोर्लेवाडी येथील एका किराणा दुकानच्या सीसीटीव्ही कॅमेरात ५ चोर कैद झाले असून त्याद्वारे बारामती शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन चोरांचा शोध घेत आहेत.यामुळे डोर्लेवाडी व झारगडवाडी गावातील नागरिकांनी सावध व सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.