पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
अवैधरित्या झाडे तोडून वाहतूक करताना पकडलेला टेम्पो सोडण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना वन परिमंडळ अधिकार्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून,प्रविण अर्जुन क्षीरसागर वय.४० वर्षे ( रा. सावतामाळीनगर,ता.शिरुर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकार्याचे नाव आहे. क्षीरसागर हा वन परिक्षेत्र अधिकारी शिरुर प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नेमणुकीला आहे. तक्रारदार हे झाडे तोडणारे ठेकेदार आहेत. ठेका घेतलेली झाडे तोडून तिची टेम्पोने वाहतूक करीत असताना प्रविण क्षीरसागर याने त्यांचा टेम्पो ताब्यात घेतला होता. तक्रारदार यांनी जुन्नर कार्यालयात जाऊन ८ हजार रुपयांचा दंड भरला व ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घोषणापत्र लिहून दिले.
११ ऑक्टोबर रोजी शिरुर वन कार्यालयात टेम्पो सोडवून घेण्यासाठी आले असता प्रविण क्षीरसागर याने टेम्पो सोडण्यासाठी व पुन्हा कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.१२ ऑक्टो रोजी सायंकाळी शिरुर वन कार्यालयात सापळा रचण्यात आला.तक्रारदाराकडून १० हजार स्वीकारताना क्षीरसागर याला पकडण्यात आले.लाचलुचपत विभागाने त्याला अटक केली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक भरत साळुंखे करीत आहेत.