पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे गटाने भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं, तेव्हापासून राज्यातील राजकीय क्षेत्रात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत.त्यामुळे आता भाजपकडून शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत एकत्र लढून बारामती लोकसभा जिंकणार असा दावा केला जात आहे.यामाध्यमातून भाजपकडून थेट शरद पवारांना आव्हान दिलं जात आहे.
शरद पवार,अजित पवार अनेक वर्षे सत्तेत होते,त्यामुळे बारामतीचा विकास केला म्हणजे उपकार केले नाही,अशी सडकून टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार व अजित पवारांवर केली आहे.यावेळी बावनकुळे म्हणाले की, बारमतीमध्ये घडी बंद पाडणे यासाठी आम्ही काम करतोय, तीन दिवस निर्मला सीतारमन मुक्कामी येणार आहेत, अठरा महिन्यात सहा वेळा त्या येणार आहेत.तेथे घडी बंद पडण्याची वेळ आली आहे. बारामती शहर म्हणजे बारामती लोकसभेचा विकास होत नाही. दौंड पुरंदर, हडपसरचं काय ? आम्हाला असं वाटतं की आम्ही बारामती जिंकू असे बावनकुळे म्हणाले आहेत.
ते पुढे बोलताना म्हणाले की, बारामतीमध्ये घडी बंद पाडू, मी कोणावरही वयक्तिक टीका केली नाही. २०२४ ला जनता ठरवेल.मी तीन महिन्यातून एकदा बारामतीला जाणार आहे.त्यामुळे बारामतीमध्ये घडी बंद पाडू, या वक्तव्यावर मी ठाम आहे, असे ते म्हणाले. त्यांनी जर बारामतीचा विकास केला असेल तर उपकार केले आहेत का ? ४० वर्ष तुम्ही सत्ता राबवली, केंद्रात सरकार तुमचं होतं. त्यामुळं बारामतीमध्ये विकास केला असेल तर बारामतीकरांवर उपकार केले नाहीत,ती जबाबदारीच आहे.बारामतीकर घडी बंद पाडतील असा मला विश्वास आहे,असेही त्यांनी सांगितले.