बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात ते लवकरच भाजपात येतील.आम्ही जिंकण्यासाठी २०२४ ची निवडणूक लढणार, आगामी विधानसभेत दोनशे पेक्षा अधिक आणि लोकसभेत पंचेचाळीस जागा जिंकणे हे आमचे उद्दिष्ट असेल.भाजपचे केंद्रीय मंत्री,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आगामी काळात राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य निवडणूका, विधानसभा लोकसभा निवडणूका लढणार आणि जिंकणार,२०२४ च्या लोकसभेत तुल्यबळ लढाई दिसेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती दौऱ्यावर येणार आहेत.
त्याआधी बानवकुळे बारामती दौरा करत आहेत.कन्हेरी गावातून दौऱ्याला सुरुवात करत आहेत. त्याआधी माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकारच्या आणि केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही बारामती दौरा करत आहोत. आमच्या संघटन शक्तीच्या बळावर आम्ही निवडणूक जिंकू,जनता धोकेबाजांना बाजूला करेल. बारामती हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. असे विचारले असता बावन कुळे म्हणाले की. बारामती मोठा किल्ला नाही, याआधीही देशात असे मोठे किल्ले उद्धवस्त झाले आहेत. जेव्हा संघटन मजबुत होते, तेव्हा संघर्ष निर्माण करण्याची ताकद निर्माण होते.
जेव्हा संघर्ष निर्माण करण्याची ताकद तयार होते तेव्हा चांगले चांगले गड उध्वस्त होतात, हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे कोणाचा गड राहत नाही, कोणाचं वर्चस्व राहत नाही, वेळेनुसार ते बदलत असतं.बारामतीतील आगामी निवडणूका आम्ही जिंकण्याकरता लढणार आहोत. आम्ही जिंकण्याकरता लढणार आहोत आणि जिंकायचं असेल तर केंद्रीय नेतृत्त्व त्यासाठी योग्य उमेदवारही देईल. कोणत्याही क्षेत्रात जर आपण कमजोर असू तर तयारीला वेळ लागतो आम्ही आमची संघटनात्मक तयारी करत आहोत. आम्हाला विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात बारामती सहीत आमच्या सर्व जागा निवडून येतील.