बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
ट्रेड इंडिशन फर्ममध्ये शेअर बाजारासाठी गुंतवणूक केल्यास ८० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत, बारामतीमधील १८ जणांना विश्वासात घेत गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून,याप्रकरणी बारामतीमधील कापड व्यावसायिक संजय सातव यांनी फिर्याद दिली असून,संजय भुसकुटे (रा.जय टॉवर चिंचवड) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ४०६,४१९,४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी संजय सातव हे शेअर बाजारात छोटी मोठी गुंतवणूक करत असत.शेअर बाजारात गुंतवणुक करत असतानाच सातव यांच्या ऑफिसमध्ये संशयित आरोपीसोबत ओळख निर्माण झाली.या भेटीदरम्यान, भुसकुटे यांनी ट्रेड इंडिशन या फर्मबद्दल सातव यांना माहिती दिली.ट्रेड इंडिशनमध्ये शेअर बाजारासाठी गुंतवणूक केल्यास ८० टक्के नफा देण्याचे अमिष दाखवले.व यामध्ये काही नुकसान अथवा तोटा झाल्यास ट्रेड इंडिशन ही फर्म जबाबदार राहिल,असे सांगत विश्वास संपादन केला.भुसकुटे हा मोतीलाल ओसवाल या शेअर मार्केटच्या कंपनीमध्ये सब ब्रोकर आहे,त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील तुम्ही काळजी करू नका असे सांगितल्याने,सातव यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी मोतीलाल ओसवाल या नावाने अँपवर अकाउंट काढत सातव यांनी ५ लाखांची गुंतवणूक केली.
सातव यांच्यासह विजय बनकर यांनी तीन लाख,सतिश किर्दक यांनी तीन लाख,कैलास कदम यांनी तीन लाख,उत्तम जगदाळे यांनी तीन लाख,जयवंत सातव यांनी तीन लाख,प्रशांत चव्हाण यांनी तीन लाख,अमोल खटावकर यांनी तीन लाख,राहुल खटावकर यांनी तीन लाख रामदास कापसे यांनी तीन लाख,सचिन शितोडे यांनी तीन लाख,बाबुराव चव्हाण यांनी तीन लाख,संजय थोरात यांनी तीन लाख,अनिता कदम यांनी तीन लाख,स्नेहल सातव यांनी तीन लाख,सुजाता सुरासे यांनी तीन लाख राजेश तांबडे यांनी तीन लाख,राजेश कवाडे यांनी तीन लाख अशा १८ जणांनी मिळून तब्बल ५९,००,००० लाखांची गुंतवणूक केली. गुंतवणुकीनंतर शेअर मार्केट अकाउंटचे आय.डी व पासवर्ड भुसकुटे याला दिले त्यानंतर भुसकुटे यांनी ठरल्याप्रमाणे ८० टक्के नफा न देता सर्व फिर्यादींचे गुंतवलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केलेली आहे असे फिर्यादींने फिर्यादीत महंटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास बारामती शहर पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करीत आहेत.