अमेरिकेच्या बोस्टनमध्ये  दुमदुमला भारतमातेचा जयघोष; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंत देखाव्यासह मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन..!!


बोस्टन/पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होत असताना तिकडे अमेरिकेच्या बोस्टनमध्येही तेथील भारतीयांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला. तेथे स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला.अल्बानी ढोल ताशा पथक (अल्बानी, न्यूयॉर्क) आणि संकल्प मराठी मंडळ (बोस्टन) आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये बोस्टन शहरावर अमेरिका-भारताचा ध्वज असलेले २२० फुटी विमान, बोस्टन हार्बर येथे ध्वजारोहण, बँडपथकासह मिरवणूक आणि भारतातील विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे फ्लोट यांचा समावेश होता.

या एकूण १५ फ्लोट्समध्ये एक महाराष्ट्र फ्लोट होता. प्रत्येक फ्लोटने भारतातील विविध राज्यांतील वैविध्य दाखवले. त्यातील सहभागींनी महान ऐतिहासिक शासक, स्वातंत्र्यसैनिक आणि विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. महाराष्ट्राच्या फ्लोटमध्ये महाराष्ट्रीय कुटुंब आणि विद्यार्थी सहभागी झाले. या फ्लोटद्वारे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई आणि स्वराज्यांच्या मावळ्यांचे दर्शन घडविण्यात आले.महाराष्ट्राच्या फ्लोटचे श्रेय अल्बानी ढोल ताशा पथक (अल्बानी, न्यूयॉर्क) आणि संकल्प मराठी मंडळ (बोस्टन) या दोन संस्थांच्या १५० सदस्यांच्या टीमला जाते. या दोन्ही संस्था उत्तर अमेरिकेतील महाराष्ट्रीय कुटुंबांना महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी उद्देशाने एकत्र आणत आहेत.

अल्बानी ढोल ताशा पथक गेल्या बारा वर्षांपासून अमेरिकेतील न्यूयॉर्क बोस्टन या शहरांमध्ये मराठी सण मोठ्या उत्साहात साजरा करते. शिवजयंती, गणेशोत्सव, दिवाळी पहाट यासह महाराष्ट्र दिन आणि मराठी संस्कृती दर्शवणाऱ्या सण उत्साहांचा आयोजन करून येथील मराठी जणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून केला जातो, असे अल्बानी ढोल ताशा पथकाचे संस्थापक अध्यक्ष कल्याण घुले यांनी सांगितले.

कोट १ :

एक संकल्प मराठी जपण्याचा’ हे ऑल्बनी ढोलताशा पथकाचे घोषवाक्य आहे. मानवी इतिहासात छत्रपती शिवरायांसारखा शूर धाडसी राजा झाला नाही. रयतेच्या स्वराज्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या या विश्ववंदनीय राजाला बोस्टन-अमेरिका येथे भव्य रथातून जिवंत देखाव्याद्वारे मानवंदना देण्याची संधी मिळत असल्याबद्दल मनात खूप आनंद आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सातासुमद्रापार जपताना खूप अभिमान वाटतो.

कल्याण घुले,संस्थापक अध्यक्ष, अल्बानी ढोलताशा पथक, न्यूयार्क

कोट २ :

या समारंभात बोस्टन (मॅसॅच्युसेट्स, अमेरिका) मधील क्रिस्टोफर कोलंबस पार्क येथे भारतीय-अमेरिकन लोकांनी ३२ देशांतील नागरिकांसोबत भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. देशभक्तीची थीम असलेले फ्लोट्स, प्रदर्शन आणि भारतीय नृत्याचा समावेश होता. आपल्या बांधवाना एकत्र आणणे तसेच आपल्या पुढच्या पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी ही कळकळ या उपक्रमामागे आहे.

संदीप जाधव, संकल्प मराठी मंडळ


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *