Political Breaking : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलारांची निवड…!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क

काही दिवसांपूर्वीच राज्यात सत्ता बदल झाला. विरोधी बाकावर बसलेला भाजप पक्ष सत्तेत आला. त्यातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. ज्यामध्ये शिंदे गटातील ९ आणि भाजपमधील ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा देखील समावेश होता. मात्र त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाले होते.ज्यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे. हे पद भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे सोपवले जाईल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र आज भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. नागपूर आणि विदर्भात त्यांच्याकडे ओबीसी नेता म्हणून पाहिलं जातं. बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणावेळी भाजपची भूमिका आक्रमकपणे मांडली होती. गेल्या १० वर्षात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेता विराजमान झालेला नाही.भाजपसाठी ओबीसी समाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे.त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावर ओबीसी नेत्याला बसवून भाजपने ओबीसींना मोठा संदेश दिला आहे.विदर्भातील भाजपचे सर्वात महत्त्वाचे दोन नेते म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांशीही बावनकुळेंचे जवळचे नाते आहे. ते दोघांच्याही मर्जीतले नेते मानले जातात.

२०१९ ची विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्यानंतर त्याचं विधानपरिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आलं होतं. विधानपरिषदेसाठी अनेकजण इच्छूक असताना त्याठिकाणी बावनकुळे यांची वर्णी लागली होती.या पदासाठी कालपर्यंत आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते पण आता अचानक हे पद बावनकुळे यांना देण्यात आले आहे. तर आशिष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. आगामी काळात होऊ घेतलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुशंगाने बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे.ते पक्षाचे अनुभवी नेते आहेत त्यामुळेच त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा विदर्भात चांगलाच प्रभाव आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे पाठबळ आहे. तसेच त्यांच्यामुळे भाजपला एक ओबीसी चेहरा मिळाला आहे ज्याचा फायदा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो.बावनकुळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री असाताना २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी राज्याच्या उर्जामंत्री पदाची धुरा देखील सांभाळली आहे. मात्र असे असूनही २०१९ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. तरी देखील नाराजी धरून न ठेवता त्यांनी पक्षाचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे त्यांची हीच एकनिष्ठता त्यांच्या कामी आली आहे, असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. बावनकुळे यांच्यात संघटन कौशल्ये असल्याने पक्ष बांधणीसाठी ते चांगले काम करू शकतात, असा विश्वास पक्षश्रेष्ठीना आहे, त्यामुळेच त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *