जगण्यासाठी शेतकऱ्यांचा मरणाशी संघर्ष..चक्क बांबूचा पूल तयार करत केला जातोय जीवघेणा प्रवास..!!


वर्धा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बळीराजाला संघर्ष चुकत नाही.अशीच म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील एका गावातील शेतकऱ्यावर आली. या शेतकऱ्यांना जगण्यासाठी थेट मरणाशीच संघर्ष करावा लागतोय. जिल्ह्याच्या हद्दीलगत दुर्लक्षित असलेल्या ताडगाव येथील हे धक्कादायक वास्तव आहे.ताडगाव हे गाव नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीवर जंगलात वसलेले आहे. या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना लाल नाल्यातून प्रवास करावा लागतो.

गावाच्या उत्तरेस असलेल्या लाल नाल्यावरून प्रवास करण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क बांबूचा पूल तयार केला. सध्या जवळजवळ दीडशे शेतकरी या पुलावरून जीवघेणा प्रवास करतायत.स्वातंत्र्य काळापासून हा संघर्षमय प्रवास येथील शेतकरी करीत असले तरी या समस्येकडे शासन आणि प्रशासनाने पाठ फिरवली असल्याचं चित्र दिसतंय. ज्या नाल्याच्या नावावरून लाल नाला प्रकल्प तालुक्यात आहे. त्याच प्रकल्पाचा हा नाला उगमस्थान आहे.

या नाल्याच्या पात्रातून नियमित पुराचा प्रवाह राहत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून यावरून प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. सात वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच यांनी प्रशासनाकडे या नाल्यावर पूल निर्मिती करण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही या पुलाची निर्मिती करण्यात आली नाही. या ठिकाणी लवकरात लवकर पुलाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *