Baramati News : बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेस पुरस्कार जाहीर..!!


आईसीएआर चा ९४ वा स्थापना दिवस साजरा..

नवी दिल्ली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शेतात नाविण्यपूर्ण प्रयोग करणारे अमरावती जिल्ह्यातील म्हसला,ता.बडनेरा येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांना आज ‘जगजीवन राम अभिनव किसान’ राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. येथील पुसा परीसरातील ए.पी.शिंदे सभागृहात आज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने ‘भारतीय कृषी संशोधन परिषदे’चा ९४ वा स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतीमध्ये विविध प्रयोग करणारे शेतकरी, वैज्ञानिक,संशोधन संस्था,शेतीशी निगडीत प्रकाशन संस्थांना वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

राज्यातील अमरावती जिल्ह्याचे शेतकरी रविंद्र मेटकर, सोलापूरातील ‘डाळींब संशोधन संस्था’, आणि बारामती येथुन प्रकाशित होणारे ‘सुफलाम’ या प्रकाशनाला केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीयमंत्री रूपाला यांनी त्यांच्या भाषणात सांगलीमधील युवकाने बैलाच्या मानेवरील ओझे कमी करण्यासाठी बनविलेले ‘रोलींग सपोर्ट’ यंत्राचा उल्लेख करून देशातील तरूण शेतक-यांच्या दृष्टीने कसा सकारात्मक विचार करतात असे रूपाला या कार्यक्रमात म्हणाले. नाविण्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी रविंद्र मेटकर रविंद्र मेटकर हे शेतीसोबत शेतीपुरक व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या शेतामध्ये कुक्कुट पालन केले आहे.यामध्ये दिड लाख अंडी देणा-या कोंबडया असून यातून त्यांना दिवसाला ९० हजार अंडी मिळतात.या अंडयांची विक्री ते मध्यप्रदेश आणि अमरावती जिल्ह्यात करतात.

कोंबडयांच्या विष्ठेचा उपयोग ते आपल्या शेतात सेंद्रीय खत म्हणून करतात.यामुळे पीकांच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात भरघोस वाढ झालेली आहे.मेटकर यांनी यावेळी आवाहन केले की,शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय करावा जेणे करून खेळता पैसा राहील आणि उत्पन्नात वाढही होईल. आज त्यांना जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपयें रोख आणि प्रशस्ती पत्र असे आहे.वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्कार’ कोरडवाहू क्षेत्रात संशोधन करणा-या संस्थाना दिले जाते. राज्यातील सोलापूर येथील ‘राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्रा’ला वर्ष २०२१ चा वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार संशोधन केंद्राचे संचालक डॉ.राजीव मराठे यांनी स्वीकारला.

डाळींब उत्पादनामुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतक-यांच्या परिस्थीतीमध्ये आमुलाग्र बदल झाला असल्याचे श्री मराठे यांनी सांगितले.१९८० च्या दशकात राज्यातील सांगोला येथे प्रथमत: डाळींबांची लागवड करण्यात आली. ५ ते १० हजार रूपये कमविणा-या शेतक-यांच्या उत्पन्नात यामुळे लाखांची वाढ झाली.सोलापूर येथील संशोधन केंद्राने येथील स्थानिक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यात हात भार लावला असल्याचे मनोगत मराठे यांनी यावेळी व्यक्त केले.शेतीशी निगडीत प्रकाशन संस्थांना ‘गणेश शंकर विद्यार्थी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.पुणे,बारामती येथील ‘राष्ट्रीय अजैव‍िक स्ट्रेस व्यवस्थापन संस्थेच्या वतीने प्रकाश‍ित होणा-या ‘सुफलाम’ या हिंदी पत्रिकेला यावेळी सन्मानित करण्यात आले. पत्रिकेचे संपादक पाठक आणि डॉ.अजय कुमार सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री तोमर,केंद्रीय मत्स्य पालन,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रूपाला,केंद्रीय कृषी व किसान कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी,निती आयोगाचे सदस्य डॉ.रमेश चंद्र,आईसीएआरचे महासंचालक त्रिलोचन महापात्र मंचावर उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *