पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शिवसेनेच्या भारत बंदच्या दरम्यान स्टॉल उघडा असल्याने दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकून देऊन जातीवाचक शिवीगाळ शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली.त्याची तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांची तक्रार न घेता त्यांना हाताने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी महादेव बाबर पोलीस निरीक्षक जानकर यांच्यासह २० जणांवर ॲट्रोसिटी कायद्यांव्ये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी कोंढवा येथील एका ३४ वर्षीय व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता ते ११ ऑक्टो.रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान कोंढवा येथील कोर्णाक पुरम सोसायटीबाहेर व पोलीस ठाण्यात घडला आहे.याप्रकरणी न्यायालयाने सीआरपीसी १५६ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण लोणकर,महादेव बाबर, अब्दुल बागवान,अस्लम बागवान, राजेंद्र बाबर,दीपक रमाणी,सईद शेख,राजू सय्यद,पोलीस निरीक्षक जानकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते,सहायक फौजदार कामथे,हवालदार गरुड, पोलीस शिपाई नदाफ,सुब्बनवाड महिाला पोलीस शिपाई सुरेखा बडे व इतर ४ ते ५ जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.शिवसेनेच्या वतीने भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते.फिर्यादी यांच्या बहिणीचा स्टाल उघडा असल्याने तो स्टॉल बंद करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आले होते.
महादेव बाबर व अब्दुल बागवान यांनी त्यांच्या दुकानातील सामान,साहित्य रस्त्यावर फेकून देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.तू खालच्या जातीचा असून तुला रुबाब आला का असे म्हणून सर्वांनी हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी हे कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असताना पोलीस निरीक्षक जानकर व इतरांनी त्यांची तक्रार न घेता हाताने मारहाण केली.अशी तक्रार फिर्यादी यांनी न्यायालयात केली होती.त्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.