मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे.शिवसेनेतून बंड करुन भाजपच्या मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता.
त्यावेळी शिवसेना उपनेते आढळराव पाटील यांनीही सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे.तसेच या पोस्टमध्ये आढळराव-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो कुठेही टाकला नाही.त्यामुळे पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत त्यांची आज सकाळी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.आढळराव पाटील यांचा पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात मोठा वाटा आहे.
२००४ मध्ये ते शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर २००९ आणि २०१४ लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. मात्र,२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला.हा पराभव आढळराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला गेला. त्यानंतर आढळराव-पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र,ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले.