बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पर्यावरण मंत्री असा उल्लेख हटवला आहे. त्यावर त्यांनी फक्त युवा सेना अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष एवढाच उल्लेख ठेवला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार की महाविकास आघाडी सरकार कोसळणार, याबाबतचे मोठे संकेत मिळू लागले आहेत.
दरम्यान,शिंदे यांच्यासोबत चाळीसहून अधिक आमदार असल्याने पक्ष फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मन वळवण्यासाठी मिलिंद नार्वेकरांना सुरतमध्ये चर्चेसाठी पाठवले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.शिंदे यांनी पुढं काय करायचं हे पक्क ठरवलं असून तसा निरोप ठाकरेंपर्यंत पोहचवला असल्याचे स्पष्ट झालं आहे.शिंदे यांनीच माध्यमांशी बोलताना याबाबत सूचक संकेत दिले आहेत.एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल जाले आहेत.आपल्यासोबत अपक्षांसह शिवसेनेचे ४६ आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिुंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाण्याचे ठरवले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मागील अडीच वर्षांपासून आमदारांच्या मनात खदखद सुरू होती.आता निर्णय घेण्याची वेळ आल्याचे आमदारांना वाटले, त्यामुळे हा निर्णय़ घेतल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
आम्ही आज सगळे आमदार एकत्र आहोत. आजही शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, विचारधारा पुढे घेऊन जात आहोत, एवढंच सांगू इच्छितो. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणार नाही. त्यांचे हिंदूत्व, राष्ट्रीयत्व, सामान्य शिवसैनिकांच्या मनातील भावना घेऊन पुढे जात आहोत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.माझी कुणावरही टीका करण्याची सवय नाही. आज बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार एकत्र आले आहे. विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजही कट्टर शिवसैनिक आहे आणि यापुढेही राहील. कारण बाळासाहेब आणि दिघेसाहेब हे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांचे विचार या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला हिंतुत्वाचे विचार दिले. ते विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असं शिंदे यांनी सांगितलं.