माळशिरस प्रतिनिधी : धनंजय थोरात
माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील तालूक्याचे ठिकाण, मुळचे याच गावचे परंतू सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले उमेश जगताप यानी तालूक्यातील ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी देऊन याच भूमीत चित्रपटाचे चित्रीकरण करुन मुळ गावाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत असल्याचे “ भूमीगत एक क्रांती” या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक अशी धुरा सांभाळणारे उमेश जगताप यानी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगीतले.
मराठवाडा मुक्ती संग्राम या ऐतिहासिक घटनेवर आधारित या चित्रपटामधून मराठवाडा मुक्तीसंग्रामात ज्यानी आपले अनमोल योगदान दिले अश्या भूमीगत क्रांतकारकांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला असून रझाकारांच्या अत्याचारांना त्यावेळी होणारा कडवा विरोध, संघर्ष, बलिदान या सर्व गोष्टींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून या कथानकाची मांडणी करण्यात आली असून या कथेची मुळ संकल्पना विवेक सौताडेकर यांची असून पटकथा संवाद स्वतः उमेश जगताप यांनीच लिहीले आहेत.
संजय खापरे,प्राजक्ता गायकवाड, सुनदा शेंडे, विशाखा, शाम सावजी या दिग्गज कलाकारांसोबत महेंद्र भांगे, शशिकांत ठोसर, अमिर शेख, नितीन सरवदे यांच्यासह स्थानिक कलावंत विजय बोकफोडे, अॅड. अविनाश काले, तानाजी बोकफोडे, अशोक जाधव आणि बऱ्याच कलावंतांना संधी मिळाली असून प्रसिध्द लावणी नृत्यांगना मृणाल कुलकर्णी हिच्यावर लावणी चित्रीत करण्यात आली आहे. चित्रपटाचे सात दिवसांचे चित्रीकरण माळशिरस परिसर आणि नृसिंहपूर येथे झाले असून उर्वरित चित्रीकरणास लवकरच कोल्हापूर आणि परिसरात सुरवात होणार असल्याचे उमेश जगताप यानी सांगीतले.
तंत्रज्ञांमध्ये छायाचित्रणाची जबाबदारी मिलींद कोठावळे यांनी सांभाळली असून कला दिग्दर्शन सुमंत कांबळे यांचे आहे. या चित्रपटासाठी मोहन मोरे यानी लावणी शब्दबध्द केली असून विनायक चिखलीकर यांनी जात्यावरील ओव्या शब्दबध्द केल्या आहेत तर या रचनांना संगीतबध्द केलेय ते प्रशांत महामुनी यांनी संगीत संयोजन जगदिश मोहिते यांनी केले असून या गीतांना अश्विनी अहिरे यांनी स्वरसाज चढविला आहे. नृत्य दिग्दर्शनाची धुरा विशाल पाटील यांनी सांभाळली आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सागर लंगोटे यांनी काम पाहिले तर कार्यकारी निर्माता म्हणून मोहन मोरे यांनी काम पाहिले आहे.