Baramati News : बारामती येथील विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्राचे उद्घाटन..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान आणि नाविन्यता केंद्र अत्यंत उपयुक्त असून प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उभारण्यासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हीटी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र उभारण्यात आले आहे.यावेळी पवार म्हणाले, राज्यात ६ ठिकाणी असे केंद्र उभारण्यात येत आहे. अशा केंद्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होईल.

जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत असून आनंदाचा निर्देशांक अधिक असलेली राष्ट्रे प्रभावशाली तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मुलांना देतात. अशी नाविन्यपूर्ण आणि कौशल्याधारीत शिक्षण प्रणाली अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे शिक्षण देण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांनी या केंद्राचा स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.उद्याचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विविध आव्हानांवर मात करण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची गरज आहे.त्यासाठी राज्य शासनातर्फे कौशल्य विकासावर भर देण्यात येत असून ‘स्वजीवी महाराष्ट्र’ उपक्रम सुरू केला आहे. युवकांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे वातावरण देण्याचा प्रयत्न आहे. उत्तम दर्जाचे व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असून त्यासाठी शिक्षकांचेही प्रशिक्षण महत्वाचे आहे ,असे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विज्ञानाविषयी आस्था निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि उत्सुकतेत भर पडेल.  जीवनात पुढे जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल.  विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक मनोभूमिका तयार केल्यास जीवनात यश नक्की मिळेल.  विज्ञान आणि नाविन्यता केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची झेप लक्षात येईल आणि त्यातून वैज्ञानिकदृष्टी विकसित होईल, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, विज्ञानाविषयी आकर्षण कायम राहून प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर, उद्योगपती गौतम अदानी, खासदार सुप्रिया सुळे,आमदार रोहित पवार, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत,डॉ.सी.डी.माई, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, प्रीती अदानी, होमी भाभा विज्ञान आणि संशोधन केंद्राचे डॉ.अर्णव भट्टाचार्य, नेहरु विज्ञान केंद्राचे डॉ.सुब्रत चौधरी, तरुण वैज्ञानिक गोपाली जी,ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *