बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
ग्रामसभेचा ठराव नसताना उभा केलेला मोबाईल टॉवर हटवण्याची नागरिकांची मागणी..
इंटरनेट सर्वसामान्य जनतेच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला असला तरी नागरी लोकवस्ती शेजारी मोबाईल टॉवर उभारल्याने टॉवरच्या रेडिएशनमुळे सर्वसामान्यांच्या जीवितास त्या टॉवर चा धोका अटळ आहे.सात महिन्यापूर्वी माझी सरपंच यांनी ग्रामसभेचा ठराव न घेता फक्त मासिक मिटिंगच्या ठरावात मोबाईल टॉवर उभा करण्याची परवानगी देत मोबाईल टॉवरच्या अधिकाऱ्यांसमवेत आर्थिक हितसंबंध जोपासत क्रीडांगणाच्या जागेवर मोबाईल टॉवर उभा करण्याची परवानगी दिल्याची जोरदार चर्चा झारगडवाडी परिसरात सुरू आहे.
याच आकसापोटी गावातील निर्माणाधीन मोबाईल टॉवर नागरी लोकवस्ती शेजारी उभारण्यास गावकऱ्यांसह माहिती अधिकार कार्यकर्ते युवराज पोटे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील १ मे ची कोरोना अभावी तहकूब झालेली ग्रामसभा ७ जून २०२२ ला घेण्यात आली. गावच्या सरपंच वैशाली मासाळ यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलेल्या ग्रामसभेत अंतर्गत रस्ते बांधणे, घरकुल मंजूर लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, संविधान सभागृह जागा उपलब्ध करून बांधणे यांसह अनेक ठराव मंजूर करण्यात आले. झारगडवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कर रूपी उत्पन्न वाढवणे हे महत्वाचे असले तरी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करून कर मिळवण्यास नागरिकांचा प्रकर्षाने विरोध जाणवत होता.
गावामध्ये अनेक कंपन्यांचे मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत.गावच्या मध्यावधी भागात खेळासाठी उभारण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या राखीव जागेवर ग्रामपंचायत प्रशासनाने मासिक सभेत ठराव मंजूर करून एका खाजगी मोबाइल कंपनीला मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. वास्तविक पाहता क्रीडांगणाच्या राखीव जागेवर इतर कुठला प्रकल्प उभा करताना तो ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेणे आवश्यक आहे.ग्रामप्रशासनाने असे संवेदनशील निर्णय मासिक मिटिंग मध्ये परस्पर मंजूर करून घेतल्याने गावकऱ्यांनी माझी सरपंचांनी सात महिन्यापूर्वी घेतलेल्या ठरावावर आक्षेप नोंदवला आहे.
मोबाईल कंपनीला इंटरनेट बाबत भविष्यातील काही तांत्रिक अडचणी भेडसावत असल्यास त्यांच्या अडचणी वैयक्तिक पातळीवर त्यांनी दुरुस्त करून मोबाईल धारकांना सेवा पुरवायला हवी. सर्वसामान्यांना वेठीस धरून भविष्यातील पिढीच्या दृष्टिकोनातून आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या निर्णयास ग्रामस्थांनी बहुमताने विरोध करून हा निर्णय रद्द करून नागरी वस्तीत बसवलेला मोबाईल टॉवर हटवण्याची मागणीने जोर धरला आहे. ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून चुकीच्या झालेल्या निर्णयावर वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत अशा संशयास्पद घेतलेल्या निर्णयांवर कारवाई करून झारगडवाडीच्या नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे अन्यथा ग्रामपंचायत प्रशासना विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय.आता प्रशासकीय अधिकारी नेमकी यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.