Saswad Crime News : सासवड दुहेरी हत्या प्रकरणात हॉटेल चालक निलेश जगतापवर खुनाचा गुन्हा दाखल ; मात्र या प्रकरणात एक नव्हे तर दोन तपासी अधिकारी बदलले..!!


सासवड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे जिल्ह्यात गाजलेल्या सासवड येथील दुहेरी हत्या प्रकरणाच्या तपासात आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे.सासवड येथे भिकाऱ्यांचा खून करण्यात आला होता.या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्वत: लक्ष घातले आहे.शनिवारी दिवसभर सासवड येथे येऊन प्रकरणाची माहिती घेऊन तपासाबाबत सूचना दिल्या.तसेच या प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात आला. सासवड येथील भोंगळे वाईन्ससमोर 24 मे रोजी तीन भिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला होता.पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र,नागरिकांनी याबाबत सखोल तपासाची मागणी केल्यानंतर पोलीस तपासात मृत लोकांना मारहाण झाल्याचे समोर आले.त्यामुळे पोलिसांनी सासवड येथील हॉटेल चालक निलेश जगताप याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली.सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे होता.त्यानंतर हा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी स्वत:कडे घेतला.मात्र हा तपास आता भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

दरम्यान आरोपी निलेश जयवंत जगताप याच्या पोलीस कोठडीत सोमवार पर्यंत वाढ करण्यात आली आहे. दोघांच्या मृत्यूने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.आमदार जगताप यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांनी हा खुनाचा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवतारे यांनी केला.तर आमदार जगताप यांनी शिवतारे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *