महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एका पोलीस शिपायाने सहकारी महिला शिपायावर बलात्कार केल्याची घटना घडली असून,एवढेच नाहीतर तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ही घटना समोर आल्यानंतर पोलीस दलात मात्र खळबळ उडाली आहे.याप्रकरणी आकाश सुरेश वाघमारे (रा.शेगाव) याच्याविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३२ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने शेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,महिला पोलीस कर्मचारी ज्या ठिकाणी कार्यरत होत्या त्याच विभागात शिपाई पदावर संशयित आरोपी आकाश वाघमारे हा देखील कार्यरत होता.संशयित आरोपीची महिला कर्मचाऱ्याशी ओळख झाली होती.यानंतर २०१६ पासून ते २०२१ पर्यंत दोघे संपर्कात होते.डिसेंबर २०२१ मध्ये आकाश वाघमारे याने पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याला फोन केला आणि शेगाव येथे बोलविले.
आकाश वाघमारे याच्या सांगण्यानुसार पोलीस महिला शेगाव येथे गेली. शेगावला पोहोचल्यावर आरोपी आकाश वाघमारे तिला गजानन महाराज मंदिराजवळ एका लॉजमध्ये घेऊन गेला.त्याठिकाणी आरोपी वाघमारे याने महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर याबाबत कुणाला सांगितले तर तुला आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत अधिक तपास शेगाव पोलीस करीत आहेत.