याप्रकरणी राज्य महिला आयोगाला केला पत्रव्यवहार रुपाली चाकणकर तत्परतेने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देणार का ?
फलटण : मुक्त प्रतिनिधी आनंद काळे
आदिवासी पारधी समाज्यातील महिलेस लोणंद पोलिसांनी व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून तमाशा मंडळामध्ये मिळालेले तब्बल ९० हजार रूपये घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे.याप्रकरणी या महिलेस मारहाण करणाऱ्या फलटण तालुका पोलीस ठाण्यातील आणि लोणंद पोलीस ठाण्यात १५ पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची मागणी देखील आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.या प्रकाराने फलटण आणि लोणंद परिसरात खळबळ उडाली आहे.
फलटण तालुक्यात घाडगेमळा ( बडेखान ) काळज या ठिकाणी राहणाऱ्या परविन मदन काळे ह्या आपल्या कुटुंबासह राहतात.जुन्नर तालुक्यातील मालतीताई इनामदार लोकनाटय तमाशा मंडळामध्ये कलावंत म्हणून परविन काळे व त्यांची सुन काम करून उदरनिर्वाह करीत आहेत. २१ मे रोजी फलटण तालुका पोलीसांनी व लोणंद पोलीस पोलिसांनी काळे यांच्या घरावर छापा टाकला असता. पीडित महिलेने पोलीसांना छाप्याबाबत विचारणा केली असता,पोलिसांनी पीडित महिलेस काठीने हातावर खांदयावर व पोटावर अमानुषपणे मारहाण केली.
मारहाण झाल्याने पीडित महिला जमिनीवर कोसळली. त्यावेळी त्यांच्या घरातील तमाशामधील कलावंताच्या कामाचे मिळालेले तब्बल ९० हजार पोलीस घेऊन गेले, असल्याचा आरोप आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेने केला आहे.आदिवासी पारधी समाजाला मुख्यप्रवाहात आणण्याऐवजी जाणून बुजून त्यांनी गुन्हेगार म्हणून जगावे असे पोलिसांना वाटत असल्याचा आरोप देखील आदिवासी पारधी परिवर्तन सभेने केला आहे.त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायदयाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी आदिवासी पारधी परिवर्तन परिषद व पीडित महिला परविन काळे ह्या कुटूंबासह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या आहेत.
याप्रकरणी आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेने गृहमंत्र्यांसह विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र,महाराष्ट्र राज्य नवी हक्क आयोग,सातारा ग्रामीण पोलीस अधीक्षक,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्रव्यवहार केला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या राज्यातील कोणत्याही ठिकाणी महिलांवर ती अन्याय झाला तर तात्काळ त्या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे आदेश देतात,त्यामुळे आता या प्रकरणाची दखल रूपाली चाकणकर घेणार का ? असा प्रश्न देखील पारधी समाजातील महिलांकडून उपस्थित केला जात आहे.