लोकसभेत असा माणूस निवडून गेला आहे,तो ब्र शब्दही काढत नाही.
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया,बारामती शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांना टोमणे लगावले.ज्या सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांना मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद मिळाले, त्या जिल्ह्यात लोकांच्या पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे.तिथं शिक्के मारायला आम्ही आलो नव्हतो.तुम्हीच त्यांना निवडून दिले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना टोला लगावला.
पिण्याच्या पाण्यावरून सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांना लक्ष्य करणाऱ्या अजित पवारांनी सोलापूरचे भाजपचे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांचाही समाचार घेतला.ते म्हणाले की,सोलापुरातून लोकसभेत असा माणूस निवडून गेला आहे,तो ब्र शब्दही काढत नाही.तुम्ही भावनिक होऊन मतदान करता. मग तुमच्याकडे कसा विकास होईल ? असा सवालही उपमुख्यमंत्र्यांनी केला.दरम्यान,एका बांधकाम व्यावसायिकाने आमच्या सोलापूर जिल्ह्यात मोठ्या फॅक्टरी आणा, असे सांगितल्याची आठवण पवार यांनी यावेळी सांगितली.
बांधकाम व्यावसाय हा सर्वात जास्त रोजगार देणारा व्यवसाय आहे. अर्थसंकल्प सादर करताना इन्फ्रास्ट्रक्चरला जास्त निधी देण्याचा प्रयत्न आम्ही करतो.कोरोनाबाबत सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा सगळ्यात जास्त फटका बांधकाम व्यावसायला बसला आहे. कोरोना काळात त्यावर अवलंबून असणाऱ्या कामगार वर्गाला मदत देण्याचं काम आम्ही केलं आहे. सिमेंट, खडी, स्टीलचे दर वाढले होते. या दरवाढीमुळे बांधकाम व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी काही बदल करता येतात का, ते पाहत आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.