Pune Crime : घराचा ताबा देण्यासाठी महिलेकडे तगादा लावणाऱ्या दोन सावकारांवर गुन्हा दाखल ; तीन लाखांचे तब्बल १७ लाख केले वसूल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुणे पोलिसांनी खासगी सावकारांविरुद्ध बकारवाईचा बडगा उगारला असून प्रति महिना ४० टक्के व्याजाने पैसे देऊन पैशांसाठी तगादा लावणाऱ्या दोन खासगी सावकारांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भा.द.वि ४५२,५००,५०४,५०६, महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपींना ताब्यात घेतले आहे.शरीफ जमादार व अरशान मनियार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संशयित आरोपींनी तक्रारदार महिलेच्या पतीकडून ३ लाखाचे १७ लाख रुपये व्याज वसुल केले आहे.याबाबत एका महिलेने गुन्हे शाखा युनिट ६ कडे तक्रारी अर्ज दिला होता.तक्रारदार महिलेच्या पतीचा शेळ्या व बकऱ्यांचा व्यवसाय असून त्यांनी जमादार आणि मनियार याच्याकडून ३ लाख रुपये कर्ज घेतले होते.आरोपींनी ४० टक्के प्रति महिना दराने तक्रारदार महिलेच्या पतीला पैसे दिले होते. याबदल्यात त्यांच्या पतीने वर्षभरात १७ लाख रुपये दिले होते.कर्ज देताना आरोपींनी तक्रारदार महिलेच्या पतीकडून पैसे हातउसने घेतल्याबाबत नोटराईज अॅग्रीमेंट करुन कर्ज तारण म्हणून राहते घर लिहून घेतले होते.

दरम्यान,शरीफ आणि अरशान यांनी तक्रारदार महिलेच्या पतीकडे व्याजाची रक्कम देण्यासाठी तगादा लावला होता.खासगी सावकारांच्या त्रासाला वैतागून महिलेचे पती घर सोडून निघून गेले.त्यामुळे आरोपींनी व्याजाच्या पैशासाठी महिलेकडे तगादा लावला.तसेच पैसे दिले नाहीतर घर खाली करुन घराचा ताबा देण्यासाठी शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट ६ करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे -२ नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील,पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके,विठ्ठल खेडकर कानिफनाथ कारखेले,नितीन मुंढे, रमेश मेमाणे,बाळासाहेब सकटे,नितीन शिंदे, ऋषीकेश टीळेकर, शेखर काटे,प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे,नितीन धाडगे,ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *