Baramati News : झारगडवाडीत वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेले,अन् पैसे घेऊन आले… पैसे घेऊन वाहने सोडल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू..!!


लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे या कर्मचाऱ्यांची तक्रार करणार…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

गेल्या काही वर्षांपासून बारामती तालुक्यात अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असून,अवैधरित्या उपसा करून विविध ठिकाणी वाळूचे साठे करून ठेवण्यात येत आहेत.असे असताना देखील महसूल विभागाकडून मात्र कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने तालुक्यातील वाळू तस्कर मोकाट झाले आहेत.दिवसा ढवळ्या शहरातील तहसील कार्यालयासमोरून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असताना दिसत आहे.त्यामुळे महसूल प्रशासन गौणखणिजाची चोरी रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे तालुक्यातील नागरिकांकडून बोलले जात आहे.

बारामती शहर हद्दीतील गुणवडी,मळद,डोर्लेवाडी परिसरात,तर तालुका हद्दीत झारगडवाडी,सोनगाव, अंजनगाव,मोरगाव,आंबी बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असताना,महसूल प्रशासन डोळ्यावर हात ठेवून आंधळे असल्याच्या भूमिकेत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.शहरात बेकायदा साठा करण्यात येणाऱ्या वाळूबाबत महसूल प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित असताना कुठेही जप्तीची कारवाई होत नाही.याच अनुषंगाने झारगडवाडी गावात कारवाईसाठी गेलेल्या काही महसूल कर्मचाऱ्यांनी झारगडवाडीतील सराईत वाळू तस्करांकडून आथिर्क मलिदा घेत वाहने सोडल्याच्या चर्चेला मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.

याप्रकरणी लवकर काही सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे या कर्मचाऱ्यांची तक्रार करणार असून,त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सेवेतून निंलबीत करण्याची मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे.या वाळू तस्करांला मात्र वारंवार महसूल कर्मचाऱ्यांकडून अभय दिले जात असल्याच्या देखील जोरदार चर्चा सुरू असून,या वाळू तस्करांवर या अगोदरही वाळू चोरीचे गुन्हे दाखल असून, याच्यावर तडीपारी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकारी लक्ष घालून या वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत आणि या तस्करांकडून मलिदा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता झारगडवाडी गावातील नागरिकांकडून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *