उरुळी कांचन : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गुंड आप्पा लोंढे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याच्यासह सहाजणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र या प्रकरणातून गोरख कानकाटे याची सबळ पुराव्याअभावी गुन्ह्यातून मुक्तता केली आहे. आरोपी संतोष मिनराव शिंदे (वय ३४ रा. शिंदवणे, ता. हवेली), निलेश खंडू सोलनकर (वय ३०, रा. डाळिंब दत्तवाडी ता. हवेली) राजेंद्र विजय गायकवाड (वय २४ रा. शिंदवणे, ता. हवेली),आकाश सुनिल महाडीक (वय २०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) विष्णू यशवंत जाधव ( वय ३७,रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता. हवेली) आणि नागेश लखन झाडकर (वय २७, रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.
तर नितीन महादेव मोगल (वय २७), मनी कुमार चंद्रा उर्फ आण्णा (वय ४५ रा. कॉमर्स झोन प्रेसकॉलनी रोड सम्राट मित्र मंडळाजवळ येरवडा पुणे मूळ रा. रामपूर जि. वारंगल राज्य आंध्रप्रदेश), विकास प्रभाकर यादव (वय ३१ रा. उरुळी कांचन ता. हवेली), गोरख बबन कानकाटे (रा. कोरेगाव मूळ इमानदारवस्ती ता. हवेली), आण्णा उर्फ बबडया किसन गवारी रा. मेमाणेवाडी ता. दौंड) प्रमोद उर्फ बापू काळूराम कांचन, सोमनाथ काळूराम कांचन रविंद्र शंकर गायकवाड (रा. तिघेही उरुळी कांचन ता. हवेली) प्रविण मारुती कुंजीर रा. वळती ता. हवेली) असे गुन्ह्यातून पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याचा २८ मे २०१५ साली उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रोड रस्त्यावर पहाटे चालण्यासाठी घराबाहेर पडले होते.
चालत असताना साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरापासून काही अंतरावर शिंदावणे रस्त्यावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी लोंढे याच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या त्याच्या छातीत व पोटात शिरल्या. त्यानंतर त्याच्या शरीरावर विविध ठिकाणी धारदार शस्त्राने वारही करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या घालून व धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.अप्पा लोंढे याची बारामती, दौंड, हवेलीसह जिल्हा व परिसरामध्ये प्रचंड दहशत होती. १९९० पासून गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या लोंढेवर खून, खुनाचे प्रयत्न, जमिनीची लुबाडणूक यांसारखे पन्नासहून अधिक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. चार गुन्ह्य़ांमध्ये त्याला शिक्षा झाली होती. २००२ मध्ये त्याचा भाऊ विलास लोंढे याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणातून गोरख कानकाटे याची सुटका झाली असली तरी तो यापूर्वीच आप्पा लोंढे याचा भाऊ भाऊ लोंढे याच्या खुन प्रकरणी जन्म ठेपेची शिक्षा भोगत आहे.