बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
चैताच्या कडक उन्हात, रक्ताच पाणी, अंगाची काहिली , हाडाची काड करुन पोटाची खळगी भरणारे ऊसतोड नगरी यांना पुस्तकदान व फळवाटप करुन जीवनाचा उन्हाळा सुसह्य केला. ग्रामीण कथाकार प्रा.रवींद्र कोकरे यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस (५० वा) ऊसाच्या फडात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण व अहिल्यानगर (पणदरे) येथील प्रा. रवींद्र कोकरे यांचा विविध उपक्रमाने अनेक सामाजिक संस्थेने फळे कापून वाढदिवस साजरा केला.
ऊस तोड कामगारांना जगण्यासाठी सहा महिने कारखान्यावर बि-हाडासह यावं लागतं. लेकराबाळांना शिक्षणापासून वंचित राहिल्याने भावी आयुष्य कोयता अन् कोप्पीवर जातयं. पुस्तक हातात देता कोयता बाजूला ठेऊन फडातच वाचन सुरु झालं.जणू आयुष्याच्या उन्हाळ्यात अविचित वाळव्याचे शिडकाव्याने गारवा निर्माण व्हावा असेच चित्र दिसत होते. ज्येष्ठ श्री व सौ. आसराबाई बाबू गेणगे यांचा शाल श्रीफळ देऊन कोकरे सरांनी सत्कार केला. युवराज बहिरवाळ,जयराम मस्के,अशोक बहिरवाळ,योगेश बहिरवाळ,सुकन्या श्रेया,परी यांना महापुरुषांची चरित्रे , आध्यात्मिक व शैक्षणिक फुलबाग पुस्तके भेट देऊन त्यांचा उचित सन्मान केला. फडातच फळे कापून हसत मुख चेह-याने भारावून जाऊन कोकरे सरांना भरभरुन शुभेच्छा दिल्या. आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच असा मानसन्मान मिळाला. आम्ही आमच्या लेकरांना शिकवणारच असा शब्द त्यांनी दिला. कोयत्या संगे पुस्तक हातात मिरवत ताठ मानाने पुन्हा भर उन्हात ऊस तोड सुरु झाली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था फलटण , महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण , बहुजन प्राथमिक शिक्षक संघटना पश्चिम महाराष्ट्र , विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ सांगवी , नाथसन फर्मस सांगवी , नवयुग तरुण मंडळ व जय तुळजा भवानी नवरात्र महोत्सव अहिल्यानगर (पणदरे) यांनी फळे ,वृक्ष ,पुस्तक द्वारे वाढदिवस कोकरे सरांचा केला.९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे निमंत्रीत कथाकार म्हणून सन्मानही केला.या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक दि.माळेगांव सहकारी साखर कारखाना शिवनगर चेअरमन , संचालक मंडळ , कामगार ,सभासद, ग्रामस्थ यांनी कौतुक केले.