रणशिंग फुंकले तू जाळण्या गुलामी,या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी… “आंबेडकरी चळवळ आणि निळया रंगाचे नक्की नाते काय ? एकदा नक्की वाचा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

“रणशिंग फुंकले तू जाळण्या गुलामी,या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी…”प्रल्हाद शिंदेंनी म्हटलेलं हे गाणं असो किंवा शंभू मीणा या राजस्थानी गायकाचं ‘रंग जाओ निला रंग में, रंग जाओ बाबासाहब के रंग में…’ डॉ. आंबेडकरांना अभिवादन हे रंगाच्याच माध्यमातून दिलेलं आपल्याला या गाण्यातून दिसतं.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसाठी निळा रंग हा आंबेडकरी चळवळीसाठी समानार्थी शब्दच वाटतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी तर त्यांच्या ध्वजात सुद्धा निळा रंग घेतलाच आहे.पण राजकीय पक्षाशी निगडित नसलेले डॉ. आंबेडकरांचे अनुनायी देखील निळा रंग हा डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचे प्रतीकच मानतात.निळा रंग आणि आंबेडकरी चळवळीचं नातं अतूट आहे.हे अनेक उदाहरणांवरून दिसते.

चळवळीमध्ये निळा रंग कुठून आला ?

याचे उत्तर द्यायचे म्हटले तर ते दोन शब्दातही देता येईल.पण त्यामागे खूप मोठा इतिहास आहे हे असं तज्ज्ञ सांगतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षाचा निळा रंग होता. समता सैनिक दलाची स्थापना १९२७ मध्ये झाली होती.समता सैनिक दलाच्या टोप्या देखील निळ्याच होत्या.आजही समता सैनिक दलाच्या टोप्या आपण पाहिल्या तर त्या निळ्याच आहेत.

“ध्वजाचा अर्थ आहे आपल्या उद्दिष्टांसाठी संघर्ष’ १९३६ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजेच स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती.मुंबई काउन्सिलच्या निवडणुकीत डॉ.आंबेडकर उभे राहिले होते तेव्हा त्यांचे चिन्ह ‘माणूस’ हे होते.पुढे त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशनची (शेकाफे) स्थापना केली.शेड्युल कास्ट फेडरेशनचे निवडणूक चिन्ह हत्ती असे होते,तर शेकाफेच्या ध्वज निळा होता.ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनची जी घटना आहे त्या घटना पुस्तिकेतील ११ व्या भागात ध्वज कसा असेल याचा उल्लेख करण्यात आला आहे. फेडरेशनच्या ध्वज म्हणजे ‘त्रिकोणी आकाराच्या निळ्या कपड्यावर तारे असतील.’

३० जानेवारी १९४४ रोजी कानपूर येथे समता सैनिक दलाची परिषद झाली होती.डॉ. आंबेडकर देखील या परिषदेला उपस्थित होते.त्यांच्यासमोर काही ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले होते त्यापैकी एक ठराव समता सैनिक दलाच्या घटनेबाबत होता.या घटनेचा मसुदा आंबेडकरांकडे पाठवण्यात आला होता आणि त्यांची मान्यता मिळाल्यावर समता सैनिक दलाची घटना लागू करण्यात आली होती.या घटनेमध्ये समता सैनिक दलाचा ध्वज कसा असेल याचा उल्लेख करण्यात आला आहे.’समता सैनिक दलाच्या ध्वजाची लांबी चार फूट आणि रुंदी अडीच फूट असेल.पूर्ण ध्वज गडद निळ्या रंगाचा असेल, ध्वजाच्या वरील डाव्या बाजूला ११ तारे पांढऱ्या रंगात असतील.’

‘ध्वजाच्या मधोमध पांढऱ्या रंगात सूर्य असेल. त्याच्या खाली SCF ही अक्षरे असतील. खालील उजव्या बाजूला SSD ही अक्षरे असतील.”या ध्वजाचा अर्थ आहे. स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,’असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे.

पुढील काळात आंबेडकरांनी आपली राजकीय भूमिका अधिक विस्तृत केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची घोषणा केली. रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ.शरण कुमार लिंबाळे लिहितात,”समविचारी लोकांनी एकत्र येऊन जाती जमातींच्या पलीकडे जाऊन शोषितांचे राजकारण करण्यासाठी एक नवा पक्ष स्थापन करण्याची बाबासाहेबांना गरज वाटू लागली. या उद्देशानेच बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती.”पार्टीची घटना,ध्येय धोरणे,पुढील वाटचाल याविषयीची ब्लू प्रिंटच त्यांनी तयार केली होती. पण ही पार्टी तयार होण्याआधीच त्यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.

३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या सहकाऱ्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.तेव्हा डॉ.आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला.निळ्या रंगाने लोकांना संरक्षण कवच प्रदान केले’निळ्या रंगाचे महत्त्व सांगताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सांगतात की निळा रंग हा व्यापकतेचं प्रतीक आहे.निळा झेंडा हा बाबासाहेबांचेच प्रतीक आहे.आणि लोकांचे त्याच्याशी भावनिक नाते जोडले गेले आहे.

त्याचे एक उदाहरण ते देतात, “महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडला आणि गावागावातले लोक मुंबईत येऊन राहत असत.जागा मिळेल त्या ठिकाणी झोपड्या बांधू लागले. त्या झोपड्यांबाहेर ते निळा झेंडा लावत असत. त्यामुळे त्यांच्या मनात एक सुरक्षितता निर्माण झाली. “राजकारणात प्रतीकांना महत्त्व आहे’ राजकारणात प्रतीकांना महत्त्व आहे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते जाणून होते, म्हणूनच त्यांनी विचारपूर्वक झेंडा तयार केला, असं अभ्यासक सांगतात.”प्रतीकांबरोबरच आंबेडकरांनी व्यवहाराच्या दृष्टिकोनातूनही या रंगाची निवड केली असू शकते,”असं मत ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार उत्तम कांबळे यांनी मांडले.

ते सांगतात,”शेकाफे स्थापन होण्याआधी हिंदुत्ववाद्यांकडे भगवा होता,कम्युनिस्टांकडे लाल होता,मुस्लिम लीगकडे हिरवा,मग सात रंगांपैकी कोणता निळा हा पर्याय त्यांच्यासमोर होता.निळा रंग ठळक उठून दिसतो आणि तो रंग जर पार्श्वभूमीवर असेल तर इतर रंगही उठून दिसतात हा एक विचार त्यामागे असू शकतो.”आणि जर त्या प्रतीकांबाबत सांगायचं म्हटलं तर निळ्या रंगाबद्दल असं म्हटलं जातं की “इट्स ए नेचर नॉट अ कलर”. म्हणजेच निळ्या रंगाशिवाय निसर्गाला पूर्णत्वच येऊ शकत नाही.समुद्र आणि आकाश या दोन्ही गोष्टी निळ्या आहेत. त्या सर्वत्र आहेत.आकाश सोडून काहीच नाही तसंच सागर सोडूनही काहीच नाही.हा विचार त्यामागे आहे.”पुढे जेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या काळात रिपब्लिकन पक्षाची आणि काँग्रेसची युती झाली तेव्हा असं म्हटलं गेलं की पांढरी टोपी आणि निळी टोपी एकत्र झाली. या रंगावर लोकांनी इतकं प्रेम केलं आहे की आता आंबेडकरी चळवळ म्हटलं तर या रंगाशिवाय ती पूर्ण होत नाही हे खरं आहे,”असं कांबळे सांगतात.

(संदर्भ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अॅंड स्पीचेस खंड : १७, सामाजिक न्याय विभाग ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र – धनंजय कीर,पॉप्युलर प्रकाशन; रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल – संपादक डॉ.शरणकुमार लिंबाळे, दिलीपराज प्रकाशन)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *