मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात सहकारी अधिकारी महिलेचा पोलिस शिपायाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.महिला पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार,संबंधित सहकारी पोलीस हवालदाराच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या कलम ३५४ (ड), ५०८ सह ६७ माहिती तंत्रज्ञान ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आरोपी हा महिला अधिकाऱ्याला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत असे,इतकंच काय तर त्या महिला अधिकाऱ्याचा पाठलागही करायचा.दरम्यान ८ एप्रिल रोजी आरोपीने महिला अधिकाऱ्याच्या मोबाईलवर रात्री १२ च्या सुमारास प्रपोजचे मेसेज देखील पाठवले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या त्रासाला कंटाळल्याने महिला अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे,असे फिर्यादींत महंटले आहे.
महिला पोलिस शिपायाची छेड अथवा फसवणुकीचा हा काही पहिलाच गुन्हा नाही, नुकतीच विलेपार्ले पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीच्या प्रकरणांमुळे महिला सुरक्षित नसल्याची टिका केली जात असताना या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील महिलाही असुरक्षित असल्याचे दिसून येते.