मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क….
एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे. चौकशीनंतर त्यांना अटक होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.त्यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी चपला फेकल्या.
शरद पवारांच्या घरावर हल्ला निषेधार्ह असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मुंबई पोलिसांनी शंभरहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे.यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी मुंबई पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले. सदावर्तेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून,त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. तेथे त्यांची चौकशी केली जाणार आहे.
यानंतर कदाचित त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी गुणरत्ने सदावर्ते यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, ‘माझी हत्या होऊ शकते. माझ्या पत्नीने दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. त्याचबरोबर मला कोणत्याही स्वरुपाची नोटीस न देता पोलिस मला घेऊन जात आहेत.’दरम्यान,गुणरत्ने सदावर्ते यांनी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना भडकवून शरद पवारांच्या निवासस्थानी पाठवले असल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत,असे सांगण्यात येत आहे.