Big Breaking : बिटकॉईन गुंतवणूकीच्या नावाखाली तब्बल ३ कोटींहून अधिकांची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बिटकॉईन या आभासी चलनात गुंतवणुकीच्या नावाखाली बिटसोलाईव्हज या कंपनीने ३६७ गुंतवणूकदारांची ३ कोटींहून अधिक रुपयांना फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुंतवणूकदारांमध्ये पोलीस,डॉक्टर,सनदी लेखापाल यांचा समावेश आहे.याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पंतनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.

बिटसोलाईव्हज या कंपनीच्या गणेश सागर, प्रशांत ब्रह्मभट्ट, चंद्रशेखर बाली, अनुज ओझा आणि मोहसीन जमील या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कंपनीच्या एका संचालकाला गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी अटक केली होती.मुंबई पोलीस लवकरच त्याचा ताबा घेणार आहेत. कंपनीच्या संचालकांनी काही दिवसांपूर्वी बैठका आणि सेमिनार आयोजित केले होते.यावेळी गुंतवणूकदारांना आभासी चलनाच्या गुंतवणुकीत फायदा मिळण्याचे आमीष दाखवून त्यांना पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले.

तसेच गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले आणि यात इतर नागरिकांन जोडले तर त्याचा स्वतंत्र नफा गुंतवणूकदारांना देणार असल्याचे सांगितले. २० महिन्यांनंतर नफ्याचे पैसे काढण्याची परवानगी होती. परंतु हा कालावधी संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना नफा किंवा त्यांनी गुंतवलेली रक्कम मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *