वडगाव निंबाळकर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील
कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न
करण्यासाठी तब्बल ४० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई आज दुपारी गुरुवारी ( दि.२४ ) रोजी केली आहे.याप्रकरणी एका ६७ वर्षीय तक्रारदाराने यासंबंधी एसीबीकडे तक्रार दिली होती.या कारवाईमुळे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार शिवाजी सातव,वय.५२ वर्षे व पोलिस नाईक गोपाळ जाधव (वय३५) अशी लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदारांना कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी या दोघांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार केली होती.या तक्रारीची पडताळणी केली असता, या गुन्ह्याचा तपास गोपाळ जाधव हे करत असल्याचे दिसून आले.तक्रादारांना अटक न करण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी या दोघांनी त्यांच्याकडे ५० हजारांची मागणी केली होती, मात्र तडजोडीअंती ही रक्कम कमी करण्यात येत रोख २५ हजार रुपये व चौकीसाठी नवीन प्रिंटर घेण्यासाठी १५ हजार रुपये अशा ४० हजारांच्या लाचेची मागणी केली असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे,पोलीस उपअधीक्षक श्रीमती शितल घोगरे,पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे, भूषण ठाकूर, पोलीस शिपाई चालक प्रशांत वाळके यांनी केलेली आहे.