इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी गावातील शिंदेवस्ती येथील शेतामध्ये अमावस्येला व पौर्णिमेला एका शेतात आर्थिक नुकसान होण्याच्या दृष्टीने,तसेच शेत कोणीही पिकवू नये आणि शेतमालकाच्या कुटुंबातील सदस्यांना मृत्यू व दुखापत घडवून आणत कुटुंबियांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी शेतात अघोरी पूजा करणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ४२७, ४४०,महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी फिर्यादी हनुमंत माणिक शिंदे,वय.५८ वर्षे ( रा.शिंदेवस्ती, गलांडवाडी नं.२, ता.इंदापूर,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी हनुमंत शिंदे आपल्या कुटुंबासह गलांडवाडी नं.१,शिंदेवस्ती येथे राहत असून,शेती करुन त्यावर कुटुंबाची उपजिवीका करत आहेत.दि.१४ जाने रोजी सकाळी ०९ च्या सुमारास शिंदे हे शेतात मक्याच्या पिकाला पाणी देण्यास गेले असता,तेथे त्यांना नारळ, टाचण्या टोचलेले लिंबु,गांधी टोपी,बागायतदार,नैवेद्य,अंडी, हळद-कुंकु,अगरबत्ती, कापूर असे साहित्य दिसून आले.हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांच्या घरी येत कुटुंबातील सदस्यांना आपल्या शेतात कोणी पुजा वगैरे केली आहे का ? असे विचारले असता कोणी पूजा केली नाही असे सदस्यांकडून सांगण्यात आले.
मात्र वहीणी रत्नप्रभा हिने सांगितले की,यापुर्वी आपल्या शेतात अशाच प्रकारे आमवस्या व पौर्णिमेच्या दिवशी कोणीतरी ब-याचवेळा पुजा केली होती. तेव्हा पूजेचे साहित्य शेतातुन बाजुला दुसरीकडे टाकुन दिले असता, त्यांच्या लक्षात आले की, कोणीतरी व्यक्तीने जाणून बुजून आम्ही आमचे शेत पिकवु नये,तसेच आमचे अर्थिक नुकसान मृत्यु व दुखापत घडवुन आणण्याच्या उद्देशाने आमच्या कुटुंबियाच्या मनामध्ये भिती निर्माण करुन आमचे शेतात नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा करुन आमच्या शेतात वारंवार पुजा अर्चा केल्याचे दिसुन आले आहे.घडलेल्या प्रकारामुळे आमच्या कुटुंबाच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दिली आहे असे फिर्यादीत म्हणंटले आहे.याबाबत अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.