भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाजवळील शंभर एकर जमीन संपादित करून भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याची केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची मागणी..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भीमा कोरेगाव येथील ऐतीहासिक विजय स्तंभ परिसरातील शंभर एकर जमीन संपादित करून भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे.त्यासाठी केंद्र सरकार च्या वतीने ५० ते १०० कोटींचा निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहील.राज्य सरकार ने १०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव विजय स्तंभ येथे भव्य स्मारक उभरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.शौर्यादिनानिमित्त आठवले यांनी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजय स्तंभास विनम्र अभिवादन केले.

१ जानेवारी १८१८ मध्ये भीमा कोरेगाव येथे ५०० शूर वीरांनी महापराक्रम गाजवीत २८ हजार पेशवे सैन्याला पराभूत केले होते. त्या शौर्याच्या प्रतिकसाठी येथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी अभिवादन करण्यास येत असत.आपल्या पूर्वजांचा शौर्याचा इतिहास पुढील पिढीला प्रेरणा देत राहील म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशामुळे दरवर्षी आंबेडकरी जनता भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यास येते.१९८० मध्ये आम्ही भारतीय दलित पँथर च्या माध्यमातून भीमा कोरेगाव येथे अभिवादन सभा घेण्याची सर्वप्रथम सुरुवात केली.त्याकाळी लोक कमी येत होते.

मात्र अलीकडच्या काळात भीमा कोरेगाव येथे दरवर्षी लाखो लोक येऊ लागले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.भीमा कोरेगाव येथे ५०० शूर वीरांनी पेशव्यांच्या २८ हजार सैन्याला पराभूत करण्याचा गाजविलेला पराक्रम आपल्या पूर्वजांची शौर्यगाथा जिवंत ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.भीमा कोरेगाव येथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभरण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपाइंचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,पुण्याच्या उपमहापौर सुनिता वाडेकर,पुणे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण,परशुराम वाडेकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *