मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सरकार जास्त काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी करुन थकले शेवटी त्यांची भविष्यवाणी खरी होईना म्हटल्यावर चंद्रकांत पाटील झोपेतून जागे झाले आणि सरकार जाण्याच्या घोषणा करु लागले मात्र आता तो मोर्चा नारायण राणे यांनी सांभाळला आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक म्हणाले. नारायण राणे यांनी महाविकास आघाडीचे सरकार मार्चपर्यंत पडेल असे भाकीत केले यावर नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला.
२३ वर्षापूर्वी नारायण राणे मुख्यमंत्री होते त्या काळापासून नवसाचे बोकड आणि कोंबड्या दाखवल्या जात आहेत आणि आता त्या कोंबड्या व बोकडासाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावं लागतंय, अशी टीका ना. नवाब मलिक यांनी केली.आमचे आघाडी सरकार खंबीर असून ते पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. या अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच वर्षांसाठी सरकार बनवले नाही तर महाराष्ट्राची जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे आमचे सरकार २५ वर्षापर्यंत टिकेल असे जाहीर केले होते. याची आठवणही नवाब मलिक यांनी यावेळी करून दिली.भाजपचे जुने नेते आता थकले आहेत आता नवीन खेळाडूंना जबाबदारी दिली आहे ते बोलतील परंतु त्याने सरकार जात नाही, अशी ठाम भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.