गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्सचा खुलासा एनसीबी आणि एनआयएने करावा : नवाब मलिक


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

काल गुजरातमधील द्वारका येथे ३५० कोटींचे ड्रग्स सापडले आहेत. त्याआधी मुंद्रा पोर्टवर तीन टन ड्रग्स सापडले होते. त्याची किंमत सुमारे २७ हजार कोटी होती. मुंद्रा पोर्ट प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. द्वारका येथे साडेतीनशे कोटींचे ड्रग्स सापडल्यानंतर आता यातले सत्य बाहेर काढणे ही एनसीबीची जबाबदारी आहे. कोण कितीही मोठे असो, राजकीय नेता किंवा राजकीय कार्यकर्ता असो ते न पाहता जो कोणी या प्रकरणात जबाबदार असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,त्याच्यावर कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

देशातून अंमली पदार्थ नेस्तनाबूत करण्यासाठी १९८५ मध्ये कायदा करण्यात आला. त्यांची अंमलबजावणी व्हावी,असेही मलिक म्हणाले.ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का ? या प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे. या ड्रग्सच्या खेळामध्ये मनीष भानुशाली,धवल भानुशाली,केपी गोसावी,सुनील पाटील हे गुजरात सरकारमधील मंत्री किरीट सिंह राणा यांच्याकडे वारंवार का जातात,ही मंडळी गुजरातमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये का राहत होते, असे प्रश्न मलिक यांनी उपस्थित केले.हे लोक गुजरातमधून ड्रग्ज रॅकेट चालवत असावेत,असा संशय देखील मलिक यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत दोन – चार ग्रॅम ड्रग्ज पकडून बॉलिवूडला बदनाम करुन प्रसिद्धी करण्यात येत आहे. पण समुद्राच्या मार्गातून गुजरातमध्ये ड्रग्स येतात.तिथून ड्रग्ज डिस्ट्रिब्युशनचे रॅकेट सुरू आहे. मोठा साठा त्याठिकाणी मिळत आहे. तिथून मनिष भानुशाली व त्यांचे सहकारी याची व्यवस्था बघतात. या प्रकरणाचा छडा एनसीबी आणि एनआयएने लावला पाहिजे. समुद्रामार्गे गुजरातच्या माध्यमातून देशभरात ड्रग्स पसरवण्याचे काम चालते हे सिद्ध होत आहे. याच्यामागे कोण आहे, याचा खुलासा एनसीबी आणि एनआयएने करावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *