झारगडवाडीच्या वाळू तस्करांना कोणाचा वरदहस्त ? दिवसा ढवळ्या वाळू तस्करी जोमात…!! महसूल प्रशासन कारवाई करणार का ?


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती तालुक्यामध्ये वाळू तस्करीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत चालले असून,तालुक्यातील झारगडवाडी गावात वाळू तस्करांना महसूल विभागाचा धाक राहिलेला दिसत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.यामुळे आता झारगडवाडी मधील वाळू तस्कर कोणाच्या वरदहस्ताने हा गोरखधंदा करीत आहेत ? व याकडे मंडल अधिकारी व तहसीलदार का कानाडोळा करीत आहेत ? त्यांचे वाळू तस्करांबरोबर अर्थपूर्ण तडजोडीचे संबंध आहे की काय ? असा प्रश्न आता झारगडवाडी ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

वाळू चोरी वर बंदी असताना अशा प्रकारची वाळू तस्करी होताना पाहून “कुंपणच तर शेती खात नाही ना ? अशी शंका आता वर्तवली जात आहे.या वाळू तस्करीमुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलला सर्रासपणे चुना लावला जात आहे. एकीकडे गोरगरीबांना घरकुलाच्या कामासाठी लागणाऱ्या वाळू साठी दहा वेळा तहसीलच्या चकरा मारून देखील गोरगरिबांना वाळू मिळत नाही,तर दुसरीकडे झारगडवाडी गावात अहोरात्र, दिवसाढवळ्या महसूल प्रशासनाला हाताशी धरून वाळू तस्करी सुरू असताना बारामती चे तहसीलदार विजय पाटील यांची यंत्रणा गप्प का ? तुमची यंत्रणा गप्प राहण्याचे गुपित काय ? असा प्रश्न आता झारगडवाडीकर उपस्थित करत आहेत.

वारंवार महसूल प्रशासनाला व तहसीलदार यांना कल्पना देऊनही झारगडवाडी गावातील वाळू उपसा बंद होताना दिसत नाही.आश्चर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी तर दिवसा वाळू तस्करी होताना दिसून येत असताना,प्रशासनाला हे वाळू माफिया जुमानत नाहीत असच काहीसं चित्र झारगडवाडी गावात निर्माण झालं आहे.यामुळे आता या वाळू तस्करांना कोणते महसूल अधिकारी यांना सहकार्य करत आहेत हे शोधून काढणं देखील महत्वाचं आहे.सोलापूर मध्ये वाळू चोरीचा ट्रक थांबवताना एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर ट्रक घालून जीवे मारून टाकण्यात आले,तर मग बारामतीचे महसूल प्रशासन कुणाच्या मृत्युची वाट बघतंय का ? अशाच प्रकारे जर बारामती तालुक्यात वाळू तस्करांचे फावले तर,अशा काही घटनांना महसूल प्रशासनाला सामोरे जाऊ लागू शकते.

यामुळे वेळीच या वाळू तस्करांच्या मुसक्या प्रशासनाने वेळीच आवळ्या पाहिजे, गावातील गाव कामगार तलाठी यांना वाळू उपशाची माहिती दिली असता,माझ्याकडे सहा गावांचा अतिरिक्त चार्ज असताना,मी तरी कुठे कुठे लक्ष देऊ अशी उत्तरे या महाशयांकडून दिली जातात. याकडे सुद्दा बारकाईने लक्ष दिले पाहिजे.यामुळे आता ज्या ज्या ठिकाणी चोरट्या पद्धतीने वाळू उपसा चालू आहे त्या ठिकाणचा सरकारचा महसूल बुडत असल्याने याला त्या ठिकाणच्या महसूल कर्मचाऱ्याला जबाबदार धरून,त्यांच्या पगारातून वाळू चोरीचा महसूल जमा करुन वरिष्ठांनी कार्यवाही करावी अशी मागणी आता झारगडवाडी ग्रामस्थांकडून होत आहे.यावर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसिलदार विजय पाटील यावर काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी क्रमशः …पुढील बातमीमध्ये कोणता महसूल कर्मचारी वाळू चोरांना मदत करतो हे नावासाहित जाहीर होणार…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *