मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकासनिधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्य सरकारने विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांच्या विकास निधीत एक कोटी रुपयांची वाढ केली असून आता आमदारांना विकास कामांसाठी चार कोटी इतका निधी मिळणार आहे.अजित पवार यांनी अर्थखात्याची जबाबदारी हातात घेतल्यापासून यावर्षात दोनदा या निधीत वाढ करण्यात आली आहे.मागील दोन वर्षांपासून राज्यात कोरोना महामारी,नैसर्गिक आपत्ती आणि लॉकडाऊनमुळे अर्थचक्र रुतले होते.तरीही अजितदादांनी आमदार निधीला कात्री लावली नव्हती.उलट या निधीत दोन वेळा वाढ केली.याचा फायदा सर्वपक्षीय आमदारांना होणार आहे.
वाढीव निधीच्या माध्यमातून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण क्षमतेने करता यावीत हा या निर्णयामागील हेतू आहे. या निधीचा उपयोग विशेषत : शाळांमधील वर्गांचे बांधकाम,अंगणवाडी केंद्र बांधकाम, व्यायाम शाळा,सार्वजनिक शौचालय,स्मशानभूमी, कोल्हापूर पद्धतीचे लहान बंधारे,अशा सार्वजनिक उपक्रमांची डागडुजी तसेच बांधणी करण्यासाठी होणाप आहे.अर्थमंत्री अजित पवार यांच्या या नियोजनाचे कौतुक खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत देखील केले होते.कोरोनामुळे एकीकडे केंद्र सरकारने खासदार निधीत कपात केली असताना दुसरीकडे राज्य सरकारने मात्र आमदारांना निधी कमी पडू दिलेला नाही.
त्यामुळे अजित पवारांनी अर्थखात्याचे जशारीतीने नियोजन केले,ते केंद्रानेही शिकावे,अशी सूचनाच सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेत केली होती.आपल्या या अचूक नियोजनाची झलक पुन्हा एकदा या निर्णयाद्वारे अजितदादांनी दाखवून दिली आहे.दरम्यान, २०११-१२ या आर्थिक वर्षापासून रु. दोन कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला जात होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या निधीत एक कोटींची वाढ करुन तो निधी तीन कोटी इतका केला होता.त्यानंतर आता पुन्हा एकदा या निधीत एक कोटींची वाढ करुन हा निधी चार कोटींपर्यंत वाढविण्यात आला आहे.