मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक पुकारली आहे. या बंदच्या समर्थनार्थ आज हुतात्मा चौक,मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.काळ्या फिती दंडाला बांधत या आंदोलनात उपस्थित राहत लखीमपूर खीरी येथील घटनेचा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते.त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली.केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.सर्व व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवण्याची भूमिका स्विकारली. विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे.हिंसेचे समर्थन होणार नाही.
कुठलेही नुकसान करायचे नाही.शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे.यावेळी खासदार सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील,नवाब मलिक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.